पापाची कबुली (अग्रलेख)   

अतिरेकी संघटनांना पाकिस्तान आश्रय देतो, त्यांना मदत करतो असे आरोप अनेक वर्षे होत आहेत आणि पाकिस्तान ते नाकारत आला आहे. पण आता खुद्द संरक्षण मंत्र्यांनीच ते जाहीरपण  कबूल  केले आहे. इंग्लंड मधील ‘स्काय’ या दूरचित्रवाणीशी बोलताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी, आपला देश अतिरेकी संघटनांना आश्रय देत असल्याचे, त्यांना आर्थिक मदत पुरवत असल्याचे मान्य केले.त्यांच्या कबुली जबाबातींल पुढचा भाग जास्त धक्कादायक आहे. ‘पाश्चात्य देशांसाठी आम्ही हे गलिच्छ काम गेली अनेक  दशके करत आहोत’ असे ते म्हणाले. आपल्या मुलाखतीत आसिफ यांनी अमेरिका व इंग्लंड या देशांची नावेही घेतली. ’पाकिस्तानात अनेक अतिरेकी संघटना नाहीत तर धर्माच्या आधारे जोडलेली एकच संघटना आहे तिचे चेहेरे अनेक आहेत’ हा त्यांचा खुलासा देखील  धक्का देणारा आहे. अर्थात भारत व अन्य देशांना त्याची माहिती नक्कीच असेल. मुंबईवरील हल्ला किंवा आताचा पहलगाम मधील हल्ला असो, प्रत्येक वेळी  लष्कर ए तोयबा या संघटनेचे व तिचा म्होरक्या हाफिज सईद  याचे नाव समोर येते त्या मागे हेच कारण आहे. तरीही  या घटनांशी आपला संबंध नसल्याचे पाकिस्तान ओरडून सांगत असते. आता संरक्षण मंत्र्यांच्या  वक्तव्यावर त्यांच्याकडे काय उत्तर आहे?आसिफ यांच्या कबुलीजबाबामुळे पाश्चात्य देशांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना जगातील दहशतवाद संपवायचा आहे की केवळ ‘निवडक’ दहशतवाद त्यांना नको आहे ? याचे उत्तर कोण देणार?
 
तरी दर्पोक्ती
 
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला झाल्यानंतर तेव्हाच्या केंद्र सरकारने अनेक देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांना त्या बद्दल माहिती दिली होती. या हल्ल्यामागे ‘लष्कर ए तोयबा’ ही संघटना आहे व ती पाकिस्तानातून  कारवाया करते याचे पुरावे या देशांना दिले होते. आताही केंद्र सरकार तसे करत  आहे. पहलगाम मधील हल्लेखोरांची ओळख प्रस्थापित झाली आहे व त्यांचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचेही सिद्ध होत आहे असे भारताने किमान ३० देशांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. पाकिस्तानचे खरे रूप उघड करण्यासाठी व त्याच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठी हे आवश्यक आहे. सिंधू नदी जल वाटप करार स्थगित केल्याने पाकिस्तानला पाणी मिळणे आता अवघड होणार आहे. त्यांच्या अर्थव्यव स्थेवर त्याचा गंभीर परिणाम होईल. पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा हा एक मार्ग आहे. मात्र आसिफ यांनी पाश्चात्य देशांचेही नाव घेतल्याने आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण होते किंवा कसे हे पाहावे लागेल. ८० च्या दशकात अफगाणिस्तान मध्ये रशियाने घूसखोरी केल्यानंतर रशिया व  अमेरिकेत छुपे युद्ध सुरु होते. त्या वेळी स्वत:स ‘मुजाहिदीन’ म्हणवून घेणार्‍या बंडखोरांना शस्त्रे व पैसे पुरवण्यासाठी पाकिस्तानची मदत अमेरिकेने घेतली होती. त्यातून अनेक अतिरेकी गट तयार झाले ते पाकिस्तान व अन्य पश्चिम आशियाई देशांत स्थिरावले हे आसिफ यांच्या विधानांवरून स्पष्ट होते. ‘आताचे अतिरेकी तेव्हा अमेरिकेत मौज करत होते,नंतर  ९/११ घडले’ असे आसिफ म्हणाले. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला होईपर्यंत अमेरिकेत हे अतिरेकी सुखाने नांदत होते असा त्याचा अर्थ होतो. अमेरिका यावर काही विधान करेल असे वाटत नाही; परंतु आसिफ अजूनही पहलगाम वरील हल्ला हा भारताने रचलेला बनाव आहे असे सांगत आहेत, पुलवामा प्रकरणही भारताचाच  बनाव असल्याचा त्यांचा दावा आहे. तो बिनबुडाचा आहे हे सर्व जग जाणून आहे. भारताने कारवाई केल्यास त्यास  त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल अशी दर्पोक्तीही त्यांनी या मुला खतीत केली. पाकिस्तान  भारताचे पाणी रोखू शकत नाही म्हणून त्यांनी ‘सिमला करार’स्थगित केला. या करारानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करणे व युद्ध बंदी पाळणे दोघांवर बंधनकारक आहे. सीमेवर गोळीबार करून  व घुसखोरी करून पाकिस्तानने कायम या कराराचे उल्लंघन केले आहे. प्रत्यक्ष आक्रमण करण्याची त्यांची ताकद नाही. त्या मुळे त्यांनी हा करार स्थगित ठेवणे निरर्थक ठरते. अतिरेक्यांना अनेक वर्षे ‘पोसले’ याची कबुली पाकिस्तानला द्यावी लागली हे महत्त्वाचे. या कबुली मुळे त्या अतिरेक्यांनी केलेली  कृत्येही त्यांनी मान्य केल्यासारखेच आहे.

Related Articles